हडपसर : स्वप्नीलला जाऊन आज १५ दिवस झाले. सगळेजण फक्त येऊन भेटायला येतात आणि आश्वासन देऊन जातात. सरकारनं एकदाच ठाम सांगावं की, आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. दोन महिन्यांनी सरकार कुणाचं का असेना, सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील, अशी स्वप्निलच्या आईवडिलांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी प्रविण दरेकरांशी बोलताना या कुटुंबानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलच्या आईला अश्रू अनावर झाले. अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय. असा सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी सरकारला विचारला आहे.
आमच्या पोटचा गोळा गेला. आम्ही त्याला कसं शिकवलं आमचं आम्हाला माहिती आहे. यांनी थोडे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. दोन दोन वर्ष निर्णय लांबवले. कोरोना काळात दोन दोन महिने फक्त लॉकडाउन केलं होतं. बाकीचं सगळं चालूच होतं. यावेळी छाया लोणकर यांनी सरकारी कारभार आणि नेतेमंडळींच्या भेटीगाठीवर देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी स्वप्नीलच्या आई-वडिलांवर असणारा कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले