पिंपरी : राज्यात आणखी कारागृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत शासन निर्णय घेणार आहे. तसेच राज्यात ५२०० पोलीस शिपाई पदांची भरती काढण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी सात हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील यांनी शनिवारी दुपारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पोलीस महासंचालक संजय पांडेय, आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, कोरोना परिस्थितीनुसार कैद्यांसाठी कारागृहात उपाययोजना केल्या आहेत. त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार काही जणांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही नवीन जेलची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतची मागणी आज झाली. त्यासंदर्भात शासन निर्णय घेईल.
कृषी, बँकिंग प्रश्नांबाबत पवार-मोदी यांच्यात चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली. त्याबाबत वळसे पाटील म्हणाले, फडणवीस हे पवार यांच्या तब्बेतीची चौकशी करायला गेले होते. पार्लमेंटचे सोमवारपासून सेशन सुरू होणार आहे. राज्यातले व देशातले काही नवीन कृषी कायदे, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, सहकाराचे व बँकिंगचे प्रश्न आहेत, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असेल, असे वाटते.