पुणे : संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक लक्ष्मण शास्त्री जाेशी यांच्यावर धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या विचारांचा माेठा पगडा हाेता. अंधश्रद्धा, धार्मिक असहिष्णुता, जमावाद्वारे होणारे गैरकृत्यासारख्या विचारात ते सतत लढत राहिले. जर्मनीत हिटलरचा उदय होऊन जगात फॅसिस्टवादी विचारसरणीचा प्रचार झाला. त्यामुळे जगाचे आतोनात नुकसान झाले. आजही देशात फॅसिस्टवादी विचारसरणीच्या आधारे राजकारभार चालविला जात आहे, जो देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे.” असे विचार खासदार आणि जेष्ठ विचारवंत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. अरूधंती खांडकर यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर लिहिलेल्या ‘स्वीमिंग अपस्ट्रीम’ या पुस्तकाच्या प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
केतकर म्हणाले,“ विचार, तत्वज्ञ, विज्ञान व तंत्रज्ञान आणि कल्पनांचा नेतृत्व करणारे राज्य महाराष्ट्र आहे. हे राज्य शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या पायावर भक्कमपणे उभारलेला आहे. येथील तत्वज्ञांनांनी आणि विचारवंतांनी विज्ञानाची कास धरण्याचा विचार मांडला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ब्राम्हण म्हणून जन्माला आले असले, तरी त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध केला. ते अंधश्रद्धा आणि अस्पृश्य विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले. त्यांना समानतेच्या तत्वावर आधारीत समाज हवा होता. त्यांचा आग्रह म्हणजे विज्ञानाच्या मूल्यांवर सर्व बाबी पडताळून पाहणे. सध्या देशात फॅसिस्टवादी विचारसरणींचा बोलबाला आहे. नागरिकांना भ्रमित करून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात आहे. गांधीजी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असला तरी ते हिंदुइझमच्या विरोधात नव्हते.”