लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : समजत नाही त्या विषयात राज्यपाल बोलतात कशाला काही कळत नाही. दुसरे ते राऊत, काय बोलतात ते त्यांना तरी समजते की नाही कोणास ठाऊक, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. आत्ता काही फार बोलणार नाही, २ एप्रिलला शिवतीर्थावर या, असे निमंत्रण त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
मनसेचा १६वा वर्धापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंदिरात झाला. वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यात प्रथमच होत असल्याने राज्यात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या धाडी व अन्य राजकीय हालचालींवर ठाकरे काही आक्रमक बोलतील, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र नक्कल करत त्यांनी राज्यपाल कोश्यारी, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
खासदार संजय राऊत काय बोलतात, हे त्यांना तरी कळते का, भविष्यातील पिढ्या आपल्याकडे पाहात आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे, आजच्या मुलांना पुढे जाऊन असे वाटेल, की राजकारणात असेच बोलतात, अशी टीका त्यांनी केली. कोरोना काळात जनतेला मदत केली, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून लोक आपल्याकडे येतात, १६ वर्षातील हीच आपली कमाई आहे, असे सांगत ठाकरे यांनी मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘आजारावर काही बोलायचे नाही’nकोणाच्या आजारावर काही बोलायचे नाही. मात्र, निवडणुका लांबणीवर जाण्याचे खरे कारण ते आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता राज ठाकरे यांनी केला.