पुणे: प्रसिध्द ' रेडिओ खगोलशास्त्रज्ञ ' व पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अशक्तपणा व इतर आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करून या क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली.पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद - नारायणगाव येथे जगातील दुसर्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.
अलाहाबाद विद्यापीठातून १९५० मध्ये विज्ञान शाखेची पद्युत्तर पदवी पदवी संपादन करून अमेरिकेतील स्टॅंडफोर्ड विद्यापीठातून पीएच.डी.पदवी संपादन केली. होमी भाभा यांच्या आमंत्रणवर डॉ. गोविंद स्वरूप यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे १९६३ पासून खगोलशास्त्र विषयक काम सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. गोविंद स्वरूप यांना पद्मश्री, भटनागर पुरस्कार आधी पुरस्कार मिळाले होते.