पुणे : नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणाºया एकूण १६ जागांसाठी येत्या ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. २१ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. निवडणुकीचा निकाल येत्या १० आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिसभा निवडणुका होणार आहे. विद्यापीठाने विशेष मोहीम राबवून पदवीधर मतदारांची नोंदणी केली असून, सुमारे ६० हजार पदवीधरांनी नोंदणी केली असून, त्यातील २६ हजार पदवीधरांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे. मात्र, पदवीधर महिला मतदारांकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केल्यामुळे तब्बल २० हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मात्र, महिलांकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी करणे चुकीचे व अन्यायकारक असून, विद्यापीठाने ही अट मागे न घेतल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवक आदित्य मावळे यांच्यासह ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, रेश्मा भोसले, स्वाती लोखंडे, माधुरी सहस्रबुद्धे यांनी याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे.अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधर, सहा संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असे १६ उमेदवार निवडून जाणार आहेत. येत्या २१ आॅगस्ट रोजी तात्पुरती मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर येत्या २२ ते २६ आॅगस्टपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. अधिसभेच्या १६ जागांसाठी रविवारी ८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत निवडणूक होणार आहे. अंतिम मतदारयादी ७ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. निवडणुकीबाबतची सूचना १२सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी इच्छुकांना २१ सप्टेंबर रोजी अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज मागे घेण्याविषयी २५ सप्टेंबरला लेखी कळवावे लागेल. मतपत्रिकांची छाननी व मोजणी १० आॅक्टोबरला होणार आहे.
पदवीधर निवडणूक ८ आॅक्टोबरला, २१ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 6:10 AM