लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर वार्ताहर : जांभोरी (ता. आंबेगाव) माचिचीवाडी येथील सरकारमान्य रास्त धान्य दुकानावर अचानक छापा टाकत तालुका पुरवठा निरीक्षकांनी पाहणी केली. यात दुकानातील धान्य निकृष्ट असल्याचे आढळले. या दुकानदारावर कारवाई होणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षकांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी (माचिचीवाडी) येथील ग्रामस्थांनी सप्टेंबर महिन्याचे धान्य खराब आले, याबाबतची तक्रार आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याची त्वरित दखल घेत तालुका पुरवठा निरीक्षक योगेश पाडळे यांना धान्य पाहणी करण्यास सांगितले. त्यावेळी जांभोरी येथील सरकारमान्य रास्त धान्य दुकान उन्नती महिला बचत गट माचिचीवाडी येथे तालुका पुरवठा निरीक्षक योगेश पाडळे व स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह त्यांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी येथील धान्याच्या साठवणूक खोल्यांमध्ये अस्वच्छ व खराब अवस्थेत धान्य होते. पावसाचे पाण्याच्या गळतीमुळे गहू, साखर भिजलेल्या अवस्थेत दिसून आले, तर दुकानात अस्वच्छता असल्याने तिथे उंदीर, घुसी, सोंडकिडे यांचा प्रादुर्भाव असल्याने धान्य खराब झाल्याचे दिसले. धान्य जमिनीवर पडून अस्ताव्यस्त होते. संबंधित दुकानात दोन ते तीन महिन्यांपूर्वीचा धान्यसाठा होता. प्रत्यक्षात रजिस्टर स्टॉक बुक व दुकानामधील धान्य यामध्ये भरपूर तफावत होती. रेशनिंग नेत असलेल्या कार्डधारकांच्या कार्डवर नोंद नाही.
दुकानात भाव फलक नव्हता, केंद्र व राज्य शासनाकडून रेशनिंग कार्डधारकांना फ्री धान्य किती आले व रोजचा धान्य साठा किती शिल्लक आहे या माहितीचा बोर्ड नव्हता. यासारखे कोणत्याही प्रकारचे बोर्ड रास्त धान्य दुकानात आवश्यक असणाना नागरिकांच्या माहितीसाठी ते नव्हते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तालुका पुरवठा अधिकारी योगेश पाडळे यांना सांगितले की, या अगोदरही आम्ही या रेशनिंग दुकानाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावेळीही असेच अधिकारी यायचे, तपासणी करायचे, पंचनामे करायचे, परंतु संबंधित दुकानावर कोणतीही कारवाई करत नसायचे. त्यामुळे तुम्ही संबंधित दुकानावर कारवाई करा, अथवा करू नका, परंतु आम्हाला नवीन दुकान द्या, अशी मागणी केली.
फोटोखालचा मजकूर :- जांभोरी, ता. आंबेगाव येथील रास्त भाव दुकानाची तपासणी करताना तालुका पुरवठा निरीक्षक योगेश पाडळे व ग्रामस्थ.