राजेगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील तरुणांनी भुकेने व्याकूळ झालेल्या माकडांसाठी धान्य गोळा करून आजच्या तरुण पिढीसमोर भूतदयेचा एक आदर्श ठेवला आहे. ग्रामदैवत शिरसाईदेवी आणि येथील देवीची माकडे हे अनन्यसाधारण नातं आहे असं मानलं जाते. गेल्या सात-आठ महिन्यांपासून येथील तरुण येथील माकडांसाठी धान्य गोळा करीत आहेत. माकडांना धान्य खाण्यासाठी येथील हनुमान मंदिरासमोर लोखंडी ट्रे ठेवले आहेत. त्यामध्ये धान्य ठेवले जाते. शेजारी पाण्याच्या कुंड्याही ठेवल्या आहेत. रावणगावमधील शिरसाईदेवीच्या माकडांना खाण्यासाठी धान्य नसल्याने माकडांची उपासमार होऊ लागली होती. खाण्याची भ्रांत म्हणून येथील माकडे स्थलांतरित होऊ लागल्याने माकडांची संख्या कमी होऊ लागली होती. काही माकडे अन्नाच्या शोधात रानोमाळ भटकू लागली होती. रावणगावचे वैभव असणारी वानरसेना हळूहळू नामशेष होईल की काय? या भीतीने येथील तरुण एकत्र आले. येथील प्राध्यापक रमेश आटोळे यांनी माहितीपत्रके छापून गावात व गावातल्या सर्व वाड्यावस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी चिकटवली. अजित आटोळे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून स्वखुशीने धान्य देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. यामधून येथील माकडांसाठी चार गोण्या धान्य जमा झाले. याकामी दत्तात्रेय नाळे, राहुल फाजगे यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे येथील माकडांचा पुढील चार-पाच महिन्यांच्या खाण्याचा प्रश्न मिटला आहे. (वार्ताहर)
रावणगावला माकडांसाठी धान्य
By admin | Published: November 18, 2016 6:09 AM