देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी

By नम्रता फडणीस | Updated: January 9, 2025 18:37 IST2025-01-09T18:36:36+5:302025-01-09T18:37:07+5:30

स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले

Gram Panchayat bandh in the state over Deshmukh murder case successful | देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी

देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने एक दिवस ग्रामपंचायत बंद करण्याच्या आंदोलनाला गुरुवारी (दि.९) राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहुतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यातील सुमारे १५००० ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीने बंदमध्ये सहभाग घेतला. भोसरे व चोभेपिंपरी ग्रामपंचायत बंद केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील सरपंच, उपसरपंच, कर्मचारी काही गावातील गावगुंडापासून भयभीत झालेले आहेत. समाजसेवा करताना अनेकजण यांच्या दबावाखाली काम करत आहेत. तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरपंचाच्या फिर्यादीनुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गावगुंडावर दाखल करावा.

यावेळी जयंत पाटील यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या. त्यात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा, ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण असावे, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांचे गावामध्ये स्मारक उभा करण्यात यावे, सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्यासाठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासनातर्फे देण्यात यावे, ग्रामसभा ही सर्व ग्रामस्थांसाठी खुली असते त्यावेळेस सर्व ग्रामस्थ तेथे सहभाग घेतात यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये गावातील लोकांना कायद्याने प्रवेश बंद असावा या मागण्यांचा समावेश होता. 

Web Title: Gram Panchayat bandh in the state over Deshmukh murder case successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.