- प्रशांत बिडवे
पुणे : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच गावातील नेते मंडळी पुण्यात आलेल्या गावकऱ्यांशी संपर्कात हाेते. सर्वांनी मतदानाला गावी यावे, आपला उमेदवार निवडून यावा यासाठी भावनिक साद घालत हाेते. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी गावकऱ्यांकडून पुण्यात फिल्डिंग लावली. त्यांना मतदानासाठी गावी घेऊन जाण्याकरिता दारात गाडी पाठवल्याचे पाहायला मिळाले.
शिक्षण, नाेकरी तसेच कामधंद्यानिमित्त मराठवाड्यातून माेठ्या संख्येने नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर, लगतच्या औद्याेगिक पट्ट्यात स्थलांतरित झाले आहेत. मराठवाड्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासह सदस्यांचे पॅनल तयार झाले आणि गावागावांमधील राजकीय नेत्यांनी पुण्या-मुंबईत राहणारे आप्तेष्ट, नातेवाईक, गावकऱ्यांशी संपर्क साधायला सुरूवात केली. मतदार यादीनुसार पुण्यात राहणाऱ्यांची नावे शाेधून काढत प्रत्येक जण जवळचे मित्र, नातेवाईकांना विविध मार्गाने संपर्क साधत हाेते.
मतदानाच्या आदल्या दिवसी अर्थात शनिवारी मतदारांच्या दिमतीसाठी मराठवाड्यातून काही जण पुण्यात दाखल झाले. दिवसभर शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मतदारांच्या घरी जात त्यांना मतदानासाठी घेऊन जाण्याची लगबग सुरू केली. काहींनी नातेवाईकांकडेच मतदार घेऊन येण्याची जबाबदारी साेपविली हाेती. मतदानासाठी मतदार गावी निघाल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. तसेच वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसून आले.
सुट्टी घ्या; पण मतदानाला या
‘माझे चुलते सरपंच पदासाठी उभे आहेत. तर काही जण ‘माझी आई, भाऊ, भावजयी सदस्य पदासाठी उभे आहे. रविवारी मतदान हाेणार आहे. काही काम असेल तर सुट्टी घ्या. ‘प्रवासासाठी वाहन पाठविताे, सगळी साेय करताे; पण मतदानाला या’ असे आर्जव त्यांच्याकडून केले जात हाेते.
गावची नाळ तुटू देणार नाही :
नाेकरीनिमित्त दहा वर्षांपासून पुण्यात असलाे तरी काय झालं? माझी गावासाेबतची नाळ तुटू देणार नाही. गावात विकास झाला पाहिजे हा आमचा उद्देश असल्याचे सांगत एक तरुण उत्साहाने मतदानाला निघाला हाेता.
नाराजी नकाे म्हणून निघालाे
गावात शेती, घर आहे. सुख दु:खात तेच पाठीशी उभे राहतात. आज इथं नाेकरी आहे. उद्या गावात जावंच लागणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांची नाराजी नकाे असे सांगत काही कामगारांनी सहकुटुंब मतदानाला जात असल्याचे सांगितले.