पुणे : जिल्ह्यातील २३१ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडली. यामध्ये गावपातळीवरील राजकारण असले तरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच पॉवर अधिक असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे बारामती तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले आहे. भोर, पुरंदर काँग्रेस तर दौंडमध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. दरम्यान, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आंबेगाव तालुक्यातील ३० पैकी २५ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व राहिले असले तरी निरगुडसरमध्ये अनपेक्षितपणे धक्का बसला आहे. निरगुडसरला सरंपचासह तीन उमेदवार शिंदे गटाचे विजयी झाले आहेत. पारगावलाहीच त्यांची तशीच अवस्था झाली आहे.
सरकारमध्ये भाजप-शिंदे आणि अजित पवार गट एकत्र आला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. अशोक पवार वगळता जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे-पाटील हेदेखील त्या गाेटात आहेत. अशा परिस्थितीमध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून शरद पवार गटाने अलिप्त राहणेच पसंत केले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये कुठेही शरद पवार गट सक्रियपणे सहभागी झाला नाही. जेवढे बाजूला जाता येईल तेवढा हा गट बाजूलाच होता. ३२ पैकी ३० ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने सत्ता मिळवली आहे. काटेवाडीत सत्ता राखण्यात यश मिळवले असले तरी एक भाजप सदस्य निवडून आला आहे. दुसरीकडे तालुक्यात भाजपने चंचुप्रवेश केला आहे. चांदुगडेवाडी, पारवडी या ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावला आहे. दोन्ही ठिकाणी सरपंच भाजपचे आहेत.
भोरमध्ये आमदार संग्राम थाेपटे आणि पुरंदरमध्ये आमदार संजय जगताप हे दोन्ही काँग्रेसचे आहेत. दोन्ही आमदारांनी तालुक्यांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. भोरमधील २७ पैकी १८ ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आहे. वेल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी काँग्रेस विजयी झाले आहेत. पुरंदरमध्ये १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत माळशिरस, वीर, भोसलेवाडी आणि आडाचीवाडी या चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसने सरपंचपदासह एकहाती सत्ता मिळवली असून, एकूण ५१ सदस्य निवडून आले आहेत. वाल्हे, आडाचीवाडी आणि सुकलवाडी या ३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. तेथेही काँग्रेसने आपला गड कायम राखला. उर्वरित ठिकाणी संमिश्र परिस्थिती आहे.
दौंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांचा करिष्मा कायम राहिला आहे. ११ पैकी १० ग्रामपंचायतीवर कुल गटाची सत्ता आहे तर माजी आमदार रमेश थोरात यांना एका ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर दोघांचाही दावा
इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी आमदार दत्तात्रय भरणे (अजित पवार गट) यांची सत्ता आली आहे, तर बावडा ग्रामपंचायतीवर भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, लाकडी आणि कांदल ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही विचारांचे उमेदवार विजयी झाल्याने आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी दोन्ही ग्रामपंचायतींवर दावा केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार असल्याचे बोलले जाते.
खेड, मुळशी, शिरुर संमिश्र तर जुन्नरमध्ये राष्ट्रवादी
खेड, मुळशी आणि शिरुर तालुक्यामध्ये संमिश्र परिस्थिती आहे. खेडमधील सात ग्रामपंचायतींवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांची सत्ता आली आहे. शिंदे गट २ तर भाजप ३ ठिकाणी विजयी झाले असून, उर्वरित ठिकाण संमिश्र असे चित्र आहे. मुळशीतही तशीच अवस्था आहे. दरम्यान, जुन्नरमध्ये मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (अजित पवार गट) यांनी १९ ठिकाणी विजय मिळवल्याचा दावा केला आहे. ४ शिवसेना (ठाकरे गट) एक शिंदे गट तर दोन अपक्ष निवडून आले आहेत.