ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:17 AM2021-01-14T11:17:34+5:302021-01-14T11:18:26+5:30
जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
पुणे : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावा-गावत धडाडणा-या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा मंगळवार (दि.13) रोजी सायंकाळी थंडावल्या. जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी आता गुरूवार (दि.15) जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आता 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत गेल्या आठ दिवसात सर्व उमेदवाराने जोरदार प्रचार केला. यात काही उमेदवारांनी सोशल मिडीयाचा वापर करत जोरदार प्रमोशन केले. तर गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावात पार्ट्यांवर पार्ट्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी पॅनल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली, घरोघरी जाऊन प्रचार, गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत तरुण उमेदवारांनी विविध माध्यमांचा वापर करत प्रचारात आघाडी घेतली. प्रचार फेरी काढताना ट्रकवर, बैलगाडी, ओपन जिप्सिचा वापर देखील मोठ्याप्रमाणात केला. तर काहीने आपल्या पदयात्रेद्वारे प्रचार केला.
आता येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
---------
मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 649
- एकूण मतदान केंद्र : 2461
- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार : 11007
- निवडणूक अधिकारी, कर्मचारी : 12305
- एकूण मतदार : 14 लाख 58 हजार 367