यवत ग्रामपंचायत दौंड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. तालुक्यातील महत्त्वाचे राजकीय वळण देणारी ग्रामपंचायत असल्याने सर्वाधिक चुरस या निवडणुकीत आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कुल व थोरात गटात मोठी रस्सीखेच आहे. मागील दहा वर्षांपासून थोरात गटाने यवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे, तर तालुक्याची आमदारकी कुल गटाच्या हातात आल्यानंतरही मागील पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन्ही गटांकडून निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड वापरत सर्व शक्ती पणाला लावली आहे, तर सर्वात मोठी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असल्याने, माजी आमदार रमेश थोरात व विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
चौकट :-
कासुर्डी ग्रामपंचायतीची निवडणूकही अटीतटीची झाली असून, गावातील नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भांडगाव ग्रामपंचायतीमध्ये सात जागा बिनविरोध झाल्याने येथील केवळ चार जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, गावातील प्रमुख विरोधक एकत्र आल्याने नेहमीची चुरस आताच्या निवडणुकीत दिसत नव्हती.