पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य व सरपंच पदासाठी एकूण ६ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात सदस्यपदांसाठी ५ हजार १०७, तर सरपंच पदासांठी १ हजार ५० अर्ज आले आहेत. अर्जांची छाननी सोमवारी (दि. ५) होणार असून, त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापासूनच उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राजकीय धुमशान वाढू लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अर्ज ऑनलाइन करावे लागणार होेते. मात्र, सर्व्हरमधील गोंधळामुळे निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. २) प्रत्यक्ष (ऑफलाइन) अर्ज भरण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे अर्जांची एकत्रित माहिती गोळा करण्यास जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत कसरत करावी लागली.
तालुकानिहाय आलेले अर्ज
- इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील २४६ जागांसाठी सर्वाधिक ९५६ अर्ज आले.
- भोरमधील ५६ ग्रामपंचायतींच्या ३८२ जागांसाठी ५८२ अर्ज आले आहेत
- सर्वांत कमी १४५ अर्ज मूळशीतील ११ ग्रामपंचायतींच्या ८८ जागांसाठी आले आहेत.
- इंदापूर तालुक्यातच सरपंचपदांसाठी सर्वाधिक १६१ अर्ज आले आहेत. येथे २६ ग्रामपंचायती आहे, तर सर्वांत कमी ३८ अर्ज मुळीतीलच ११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आले आहेत.
- अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १,८६३ सदस्यपदांसाठी ५,०७७ जणांनी ५,१०७ अर्ज दाखल केले, तर २२१ सरपंचपदांसाठी १०४६ जणांनी १०५० अर्ज दाखल केले.
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर
अर्जांची छाननी सोमवारी (दि. ५) हाेणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल, तर मतमोजणी २० डिसेंबरला हाेईल.
तालुकानिहाय आलेले अर्ज :
तालुका- ग्रामपंचायती- सदस्य- सरपंच
वेल्हे- २८- २८४- ९९
भोर -५४- ५८२- १६०
दौंड- ८- २६८- ४८
बारामती- १३- ५९८- १०८
इंदापूर- २६- ९५६- १६१
जुन्नर- १७- ३३४- ७१
आंबेगाव- २१- ५११- ९८
खेड- २३- ६०१- १३१
शिरूर- ४- २१५- ३४
मावळ- ९- २२५-५१
मुळशी- ११- १४५- ३८
हवेली- ७- ३८८- ५१
एकूण- २२१- ५१०७- १०५०