पुणे : जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि भोर तालुक्यांतील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. ११ ठिकाणी शिवसेना व संमिश्र सत्ता आली असून, भाजपला केवळ ४ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. महत्त्वाचे म्हणचे अडीच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले होते. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्याचा या निवडणुकांवर परिणाम होईल, असे वाटत असतानाच जिल्ह्यात मात्र, राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम राखला आहे.
भोर तालुक्यात काँग्रेसचे आमदार संग्राम थाेपटे यांना राष्ट्रवादीने जोराचा धक्का दिला आहे. अनेक वर्षांपासून भोलावडे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीने ही सत्ता उलथवून ११ पैकी ८ सदस्यांच्या जोरावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सरपंच पदाची माळही राष्ट्रवादीच्या गळ्यात पडली आहे. तर दुसरीकडे आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली असून, ३ शिंदे गट तर एका ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे.
जुन्नरमधील ३६ पैकी २६ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपा यांना प्रत्येकी ३ ग्राम पंचायतीत यश मिळाल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. सरपंच व सदस्य असे १०० टक्के महिलाराज असे वैशिष्ट्य ठरलेल्या केवाडी ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आहे.