पुणे : जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येतील. २९, ३० एप्रिल आणि १ मे या सार्वजनिक सुटीच्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत.
अर्जांची छाननी ३ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. तर ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ मे रोजी होईल.