राजगुरूनगर : खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २३ पैकी ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडुन आले. वाडा, देवोशी भांबोली, मांजरेवाडी, अनावळे, आंभु, येलवाडी या गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले.
लोकनियुक्त सरपंच पदासाठी १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुक रिगंणात ५४ उमेदवार उतरले आहे. २३ पैकी २ ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध झाली. एकूण ७५ प्रभागातील १९३ जागांपैकी ८१ जागा बिनविरोध झाल्या तर अवघ्या २ जागा रिक्त राहिल्या. २१ ग्रामपंचायतीच्या ६२ प्रभागातील ११० जागांसाठी २३३ उमेदवारांमध्ये निवडणूक होत असून लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीत महिलांनी बाजी मारत ६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर महिलांची तर एका ग्रामपंचायतीवर पुरुष बिनविरोध निवड झाली.
तालुक्यातील २३ ग्रामपंचायती पैकी अनिता मांजरे ( मांजरेवाडी ) आणि रणजित विठ्ठल गाडे ( येलवाडी ) या दोन ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्यांची निवड बिनविरोध झाली. चासकमान धरणांतर्गत पश्चिम भागातील (देवोशी) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन दाखल करण्यात आलेल्या लीलाबाई देवराम लव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली. तर नामनिर्देशन पत्र माघारीच्या दिवशी समोपचाराने सरपंच पदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे रुपाली शिवाजी मोरे (वाडा ) शीतल काळुराम पिंजण (भांबोली),अश्विनी भानुदास कुडेकर (अनावळे) ,वच्छला ज्ञानदेव काबंळे (आंभू), यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र राहिल्याने बिनविरोध निवडून आले. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या १९३ जागांसाठी ६०१ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. छाननी नंतर ५ नामनिर्देशन पत्र अवैध ठरली होती. उर्वरित ५९६ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र अखेरच्या माघारीच्या दिवशी २८४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ८१ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ११० जागांच्या निवडणूक २३३ उमेदवार लढवत असून बहुतेक जागांवर दुरंगी लढती आहेत.
चासकमानधरणालगत असणाऱ्या वाडा येथे बिनविरोध सरपंच पदाची निवड करण्यात आली. सदस्य पदासाठी निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप या पक्षाला मानणारे मतदार असल्याने या ठिकाणी तालुक्याचे लक्ष लागले आहे. चास येथेही चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी शिवसेना,राष्ट्रवादी या पक्षाला मानणारे मतदार आहेत. तसेच पूर्व भागातील दौंडकरवाडी,बहूळ,शेलगाव, साबळेवाडी,सिद्धेगव्हाण या गावांच्या शेजारीच आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे गाव असल्याने या ग्रामपंचायतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या कार्यकर्त्याची फळी आहे. या ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहे.
२३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपद बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थानी प्रयत्न केले. काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सदस्य बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले नाही. तालुक्यातील येलवाडी,मांजरेवाडी,भांबोली या गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. चास,वाडा,शेलगाव, दोंडकरवाडी,बहुळ या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.- बी. के. लंघे (निवडणूक निर्णय अधिकारी )