लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ८५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता ६६३ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. परंतु जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. अनेक मतदारांच्या बोटाची शाई अद्याप गेलेली नाही. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. आपल्या जिल्ह्यात नजीकच्या काळात एखादी सार्वत्रिक निवडणूक झाली असेल व मतदाराच्या बोटावरील निशाणी मिटलेली नसेल व त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणुकीमध्ये मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी. जर मधल्या बोटालादेखाल शाईची निशाणी असेल तर जिल्हाधिकारी/महापालिका आयुक्त यांनी निवडणुकीमध्ये मतदाराच्या कोणत्या बोटाला शाई लावण्यात येईल याबाबत आदेश काढावेत आणि त्यानुसार स्पष्ट सूचना सर्व संबंधित मतदान केंद्राध्यक्षांना द्याव्यात, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तर्जनीऐवजी मधल्या बोटावर शाई लावण्याचे आदेश दिले आहेत.