नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची मोडकळीस आलेली इमारत व जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून बांधकाम करता येत नव्हते; मात्र आता ही जागा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून तेथे जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेचे बांधकाम करून घेण्याचा ठरावच ग्रामपचायतीने मंजूर केला आहे त्यामुळे अनेक वर्षा्पासून प्रतीक्षेत असलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.नीरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचा काही भाग धोकादायक असल्याचे व तो भाग कधीही पडू शकतो, यामुळे ही इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नीरा विकास आघाडीच्या प्रमुख नाना जोशी व काही सदस्यांनी कली होती; मात्र ही शाळा इमारत व जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्यामुळे आपण कोणतेही काम करू शकत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले होते. ही जागा जिल्हा परिषदेला देण्यावरून गावात दोन भिन्न मत प्रवाह आहेत.यापूर्वी झालेल्या एका ग्रामसभेत ही जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात ठेवावी, असा ठराव संमत करण्यात आला होता. यानंतर शाळेचे स्ट्रकचरल आॅडिटही करण्यात आले. मात्र, यामध्ये शाळा धोकादायक असल्याचा स्पष्ट अहवाल न देता शाळा दुरुस्त होऊ शकते असे म्हटले होते.जिल्हा परिषदेला शाळा देण्यास विरोधशाळा गावासाठीच असेल तर जागा शाळेस देऊन नवीन शाळा बांधकाम करण्यास काय हरकत आहे, असे मत असलेला एक वर्ग असताना, दुसरा जिल्हा परिषद एका टप्प्यात एवढी मोठी इमारत बांधू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची मोक्याची मिळकत जिल्हा परिषदेला कशाला द्यायची, जिल्हा परिषदेने थकीत भाडे जरी दिले, तरी आपण शाळा दुरुस्त करू शकतो असा मतप्रवाह आहे. त्यामुळे हा प्रश्न जटिल बनला आहे. दोन्ही मते मांडणारे आपला हेका घेऊन बसले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत सदस्यांच्या झालेल्या मासिक मिटिंगमध्ये उपसरपंच गटाने हा ठराव बहुमताच्या जोरवर संमत केला आला असला, तरी सरपंच गटाकडून त्याला विरोधच करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होईल का नाही त्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद शाळेची ही इमारत धोकादायक आहे. त्यामुळे येथील चार वर्ग खोल्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळा दोन सत्रात भरवावी लागते. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे व नवीन इमारत बांधने हा एकमेव मार्ग आहे. कारण ग्रामपंचायतीकडे एवढा मोठा निधी उपलब्ध नाही. याबाबतचा ठराव नुकताच बहुमताने मंजूर करण्यात आला असून लवकरच कार्यवाही होईल.- बाळासाहेब भोसले,उपसरपंच, नीरानीरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारतीची स्थिती जर खरच धोकादायक असेल, तर राजकारण बाजूला ठेवून तातडीने काही निर्णय घेणे गरजेचे आहे. नीरा शहरात पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पुरंदर तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यातील सर्वांत अधिक पटसंख्या असलेली शाळा आहे. नारायणपूर शाळा दुर्घटनेनंतर तरी शिक्षण विभागाने या शाळेचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.- प्रमोद काकडे, (युवकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, नीरा शहर)नुकतीच झालेली मासिक मिटिंग ही तहकूब मिटिंग होती. शाळा इमारतीची जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. ती जिल्हा परिषदेला द्यायची असल्यास विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी निर्णय द्यावा. शाळेची इमारत धोकादायक आहे हे मान्य केले तरी, एकाच वेळी बांधकामासाठी एवढी मोठी रक्कम जिल्हा परिषद खर्च करू शकत नाही. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांतून निधी उपलब्ध करून घ्यावा लागेल.- अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायतीने शाळा दुरुस्तीच्या खर्चासाठी जि.प.ला दिली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:35 AM