घोडेगाव (पुणे) :आंबेगाव तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच लागू शकतो. यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दि. १३ ऑक्टोबर असून, हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दि. १८ ऑक्टोबर आहे, अशी माहिती आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये आहुपे, तळेघर, डिंभे खुर्द, घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, चांडोली बु., कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, धामणी, भावडी, नारोडी, गोहे खुर्द, निघोटवाडी, रांजणी, चिखली व नागापूर या २१ ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्याचा दि. ३१ मे २०२२, प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्याचा दि. १३ ऑक्टोबर २०२२, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १३ ते १८ ऑक्टोबरपर्यंत आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.