पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रवीण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा़ वाळद, ता. खेड), नीलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा. वांझरवाडी, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे. बुधवारी प्रचार संपला असून शुक्रवारी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पेट्रोलिंग सुरु केले होते.
गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बस स्टँडवर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बसस्टँडवर पोहोचले. तेथे त्यांनी संशयास्पद वावरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांची अंगझडती घेतली असता दोघांचा कमरेला प्रत्येकी २ अशी देशी बनावटीची ४ पिस्तुले आणि त्यात प्रत्येकी २ अशी एकूण ८ काडतुसे आढळून आली. दोघांनाही अटक करुन खेड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक निरीक्षक अमोल गोरे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निच्चीत मुकुंद आयचित, प्रमोद नवले, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने केली आहे.
फोटो : खेड येथील बसस्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले जप्त करणारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक