तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यात २० गावे हॉटस्पॉट असून झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात न आल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा, असे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठरवून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भात तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर)येथे बैठक झाली. यावेळी तहसीलदार लैला शेख,गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दामोदर मोरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, अवीना अल्हाट, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, मंडल अधिकारी राजेंद्र आळणे आदी उपस्थित होते.
संतोषकुमार देशमुख म्हणाले की, आरोग्य विभागाने ॲंटीजन टेस्ट तपासण्या वाढवाव्यात, अनधिकृत टेस्ट चालू असतील तर यावर त्वरित कारवाई करावी. कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा. तहसीलदारांनी लेखी आदेश काढूनही मागील सोमवारी आठवडे बाजार भरल्याचे निदर्शनास आले. व्यापाऱ्यांनी आठवडे बाजार भरवण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आदी सूचना केल्या.
२० हॉटस्पॉट गावांतील १४ दिवसांची बाधितांची संख्या
शिरूर ग्रामीण-७२ सणसवाडी-५९ शिक्रापूर-१५६ तळेगाव ढमढेरे-६१ रांजणगाव गणपती-७६ न्हावरा-३९ कारेगाव-२४ शिरसगाव काटा-१७ मांडवगण फराटा-१४ कोरेगाव भीमा-१३ निमगाव म्हाळुंगी-१७ निमोणे-१४ चिंचणी-१४ टाकळी हाजी-१७ आमदाबाद-१० पाबळ-१६ आंधळगाव-११ आंबळे-११ कोंढापुरी-११ तरडोबाचीवाडी-१४.
०१ तळेगाव ढमढेरे
बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख.