पुणे : पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू पेरण्यांची लगबग वाढली असून, जिरायती पिकं जगवली अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मात्र, डाळिंब, द्राक्ष, कांदा उत्पादकांना थोडी काळजी असून, पुढील काळात रोगापासून पीक वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून आले आणि संध्याकाळनंतर बारामती वगळता सर्वच तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. सरासरी २५.१२ मिलिमीटर पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि १४.३६ मिलिमीटर तो बरसला. या दोन दिवसांत जिल्ह्यात २९.४८ मिलिमीटर पाऊस झाला.मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. यात रविवारी ३३.२८ व सोमवारी ३८.४२ असा ७१.७ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सर्वांत कमी ३.७२ मिलिमीटर इंदापूर तालुक्यात झाला. यंदा जिल्ह्यात दर वर्षीपेक्षा पावसाची मोठी तूट आहे. धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विहिरींची पातळीही खालावली आहे. यामुळे पाण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. जिल्ह्यात पावसाळ््यातही टँकर सुरूच राहिले असून, त्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. अशातच दोन दिवस झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)धान्य झाले नाही, तरी जनावरांना चारा मिळेलबरामती तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पावसाने जिरायती पिकांना संजीवनी मिळाली. जनावरांना ज्वारी पिकांचा कडबा शाश्वत होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाने तारले आहे. मोरगाव, तरडोली, आंबी, मुर्टी आदी भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या ज्वारी पिकांला संजीवनी मिळाली आहे. या भागातील शाश्वत पीक म्हणूण गणले जाणारी ज्वारी पाण्याअभावी जळू लागली होती. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे धान्य नाही झाले तरी जनावरांना कडबा व बाटुक होणार आहे.हा पाऊस तसा जिरायती भागातील पिकांना जीवदान देऊन गेला. ढगाळ हवामान राहिले, तर पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठानेच शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करावी- रमेश धुमाळ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद
जिरायती पिकं जगविली!
By admin | Published: November 26, 2015 1:02 AM