पुणे : गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे शहर भाजप कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाह यांनी काँग्रेसबरोबर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली आहे. तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरणार नसल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. महाआघाडी सरकार म्हणजे तीन दिशांना जाणारे पंक्चर झालेले टायर असून पुढे न जाता केवळ धूर सोडतात अशी टीका त्यांनी कार्यक्रमात महाविकास आघाडीवर केली आहे.
शाह म्हणाले, आज त्यांची तब्येत ठीक नाहीये. जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही महाराष्ट्रातील जनता विचारत होती कि कुठे आहे सरकार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. ''स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. सरकार आमचा जन्मसिद्ध अधिकर आहे असे शिवसेना समजत आहे. आम्ही दोन हात करण्याच्या तयारीत आहोत. तिघे एकत्र या आम्ही एकटे भारी पडू असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.''
मोदींमुळे लोकांना कळलं कि हेच करून दाखवणारे सरकार राममंदिर बनवणे हा आमचा राजकीय कार्यक्रम आहे. अशी टीका आमच्यावर होत होती. मंदिर कधीच बनणार नाही असं बोललं जात होतं. आज नरेंद्र मोदींनी मंदिराच भूमिपूजन केलं. एक भव्य मंदिर तिथे उभे राहणार आहे. देशात काँग्रेस सरकार होते तेव्हा देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त होती. सुरक्षा धोक्यात होती. मोदी आल्यावर लोकांना कळलं कि मौनी बाबाची सत्ता नाही. हे तर करून दाखवणाऱ्यांचे सरकार आहे.