भोर: भोर विधानसभा मतदारसंघात शंकर मांडेकर यांना मुळशी तालुक्याने दिलेले भरभरून मतदान आणि भोर, वेल्हे तालुक्यांची मिळालेली साथ. याउलट मुळशीत संग्राम थोपटे यांना कमी झालेले मतदान आणि भोर, वेल्हेत अपेक्षित न मिळालेल्या मतदानामुळे थोपटे यांचे विजयाचे गणित बिघडले आणि मांडेकर यांचा विजय सोपा झाला. २५ वर्षांनंतर भोर विधानसभेत सत्तांतर झाले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघात ४७७ गावे आणि ५६४ मतदान केंद्र असून, सर्वाधिक लांब व दुर्गम डोंगरी भाग असलेला राज्यातील अत्यंत अवघड आणि किचकट असा मतदारसंघ आहे. भोर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान ४,३०,२७८ पैकी २,९१,७०४ (६७.७९ टक्के) मतदान झाले. भोर तालुक्यात १,७०,२१३ पैकी १,२५,१७६ (७३.५४ टक्के) मतदान झाले. वेल्हे ५४,०५४ पैकी ३९,९२१ (७३.८०), मुळशी २,०६,०१५ पैकी १,२६,६०७ (६१.४६) मतदान झाले आहे. यात राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) शंकर मांडेकर यांना १,२६,४५२ मते, संग्राम थोपटे यांना १,०६,८१७ मते, कुलदीप कोंडे यांना २९,०६५ मते, किरण दगडे यांना २५,४९८ मते, नोटाला २७११ मते मिळाली आहेत. शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा १९,६३५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. तब्बल २५ वर्षांनंतर भोर विधानसभेत सत्तांतर झाले असून, मुळशी तालुक्याला १५ वर्षांनंतर आमदार मिळाला आहे.
दरम्यान, मुळशी तालुक्यात झालेल्या १,२६,६०६ मतदानापैकी ८२ हजार मते शंकर मांडेकर यांना तर २७,४६४ मते संग्राम थोपटे यांना मिळाली. एकूण मतांपैकी म्हणजे तब्बल ६४ टक्के मतदान शंकर मांडेकर यांनी घेतले आणि ५३,०९४ मतांची थोपटे यांच्यावर आघाडी घेतली. तर भोर आणि वेल्हे तालुक्यांत ४५,६९४ मते मांडेकर यांना मिळाली. संग्राम थोपटे यांना भोर, वेल्हेत ७८,८८१ मते मिळून थोपटे यांनी ३३,१८७ मतांची आघाडी घेतली. मात्र, मुळशी तालुक्यातील आघाडी कमी करण्यासाठी थोपटेंना भोर, वेल्हेत अपेक्षित मतदान झाले नाही. आणि सुमारे १९,६३५ मतांनी शंकर मांडेकर यांचा विजय झाला. मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद कमी झाली होती. उद्धवसेनेचे विभागलेले मतदान यामुळे काँग्रेसला मागच्या तुलनेत ८ हजारने कमी मतदान झाले. तर राष्ट्रवादीला १५ वर्षांनंतर मुळशी तालुक्याला मिळालेली उमेदवारी तसेच मुळशीतील सर्वच पक्षांनी केलेल्या एकीमुळे भरघोस मतदान झाले. तसेच मुळशीऐवजी भोर तालुक्यात घेतलेले अधिकचे मतदान यामुळे मांडेकर यांचा विजय अधिकच सुकर झाला.
कुलदीप कोंडे यांचे भावनिक आवाहन
किरण दगडे यांनी बाळुमामा आणि काशी यात्रा घडवली. यामुळे अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार, युतीला तोटा होणार असे वाटप असताना दोन्ही उमेदवारांचा महाविकास आघाडीला फटका बसला. अजित पवारांची मुळशीला उमेदवारी देण्याची खेळी यशस्वी झाली. भोर मतदारसंघात बदल करा, आत्ता नाही तर कधीच नाही. बाबांनो राग येऊ द्या, कामाला पुढील निवडणुकीत मुळशी भोर विधानसभेत त्यामुळे यावेळीच मुळशीचा आमदार होऊ द्या. भोर मतदारसंघातील विकासकामांना ५ हजार कोटी देतो. मी शब्दाचा पक्का आहे, अशा पद्धतीने थोपटेंना लक्ष्य करून बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. यामुळे मुळशीत मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली आणि ती भोर, वेल्हे तालुक्यांत कमी करण्यात थोपटे अयशस्वी झाले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
औद्योगिक वसाहत, पर्यटन विकास, रोजगार मुद्दे ठरले कळीचे
भोर व वेल्हे तालुक्यांत औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. गडकिल्ले असूनही पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला नाही. त्यामुळे रोजगार नाही. यामुळे तरुणांचा मोठा रोष होता. याशिवाय कालवे उपसा योजना अपूर्ण, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याचाही मोठ्या प्रमाणात निवडणुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. याचा परिणाम थोपटेंच्या बालेकिल्ल्याची पडझड झाली आणि १९९९ नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने भोर विधानसभेत शिरकाव केला आहे.