जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे , पुणे : राज्यात सरकारमध्ये मित्रपक्ष असलेले जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी यांची चांगलीच अडचण झाली आहे. यात काही पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेते व कार्यकर्ते यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचले. या वादामुळे राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये ठिणगी पडते की काय, असे वातावरण निर्माण झाल्याने शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रत्यक्ष खेड तालुक्यात येऊन वातावरण शांत करण्याची वेळ आली.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह बहुतेक सर्व पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात महाआघाडी सरकारमध्ये मित्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यात
राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आमनेसामने आहेत. तर भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. तर शिरूर, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात देखील राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान आहे. यामुळे दोन वर्षभर राज्यात सत्तेत एकत्र असलेले मित्रपक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काय करणार याचे राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत.
-------
पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांपैकी सहा पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तीन पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे सभापती, एका पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता आहे. एकूणच ग्रामीण भागातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी एकमेकांना पाठिंबा दिला आहे.
------
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता
जिल्हा परिषदेत ७५ सदस्यांपैकी एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ सदस्य असून, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना जबाबदारी निभावत आहे. शिवसेनेचे १४ सदस्य तर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी सात सदस्य आहेत व इतर पाच सदस्य आहेत.
--------
राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यासह बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामीण भागात आमच्या पक्षाची ताकद मोठी आहे. यामुळेच सर्व गोष्टींचा विचार केला असता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढविणार.
- प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष
--------
काँग्रेसची स्वबळाचीच तयारी
जिल्ह्यात आजही काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. जिल्ह्यात काही तालुक्यांत आमच्या पक्षाचे वर्चस्व आहे. तसेच काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा दिल्या असून, जिल्ह्यातील देखील स्वबळाची तयारी सुरू आहे.
- संजय जगताप, आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष
---------
पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यानुसार अंमलबजावणी
राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहोत. तसेच जिल्ह्यात देखील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्यास फायदा होऊ शकतो. शिवसेनेने देखील स्वबळाची तयारी सुरू केली आहे.
- रमेश कोंडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष