सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मिनी विधानसभा’ म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील निम्यापेक्षा अधिक म्हणजे ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा रणसंग्राम सुरू झाला आहे. राज्याची सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले तीन पक्ष गावकीच्या राजकारणात मात्र एकमेकांविरोधात भिडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच अचडण झाली आहे.
कोरोना संकटामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२० अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.
राज्याच्या मंत्रीमंडळात एकत्र बसणाऱ्या पक्षांच्या जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर मात्र सख्य नाही. काही ठिकाणी तर कट्टर राजकीय वैर आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची कसरत होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही तालुक्यांमध्ये शिवसेना तर कॉंग्रेस सत्तेत आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड , पुरंदर तालुक्यात ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. शिरूर, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात भाजपाचा प्रयत्न राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण करण्याचा असेल.
--------
निवडणुका होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
खेड -९१, भोर-७३, शिरूर-७१, जुन्नर-६६, पुरंदर-६८, इंदापूर-६०, मावळ - ५७, हवेली- ५४, बारामती- ५२, दौंड - ५१, मुळशी - ४५, वेल्हा - ३१, आंबेगाव- २९, पिंपरी-चिंचवड- १, एकूण : ७४८
---------
असा आहे कार्यक्रम
- तहसिलदारामार्फत निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे : १५ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज दाखल करणे : २३ ते ३० डिसेंबर
- उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ४ जानेवारी २०२१
- मतदान : १५ जानेवारी २०२१
- मतमोजणी : १८ जानेवारी
चौकट
राज्यातले मित्र गावात पारंपारिक विरोधक
महाआघाडी सरकारमध्ये एकत्र सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या प्रत्येक पक्षाची पुणे जिल्ह्यात स्वत:ची ताकद आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निकराचा संघर्ष करून आपापल्या गावात आपापल्या पक्षाचा झेंडा रोवलेला आहे. मात्र महाआघाडीच्या राजकारणात हा झेंडा फडकत ठेवण्यासाठी आता अडचण येण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढल्या जात नसल्या तरी स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समिकरणे जुळवली जाणार याची उत्सुकता आता गावकऱ्यांना असेल.