पुणे: पुस्तक वाचनाने माणसू समृध्द होतो. त्यामुळे पुस्तके वाचली पाहिजेत. हाच संदेश देण्यासाठी जय गणेश व्यासपीठ पुणे शहर यांच्या वतीने बाप्पासाठी पुस्तकांचा नैवैद्य दिला. पुण्यातील विविध गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रथम प्रस्थापित गणपती विंचूरकर वाडा येथे बाप्पांच्या चरणी पुस्तके अर्पण केली.
बाल साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले. शिरीष मोहिते, पियुष शहा, अमर लांडे, सचिन पवार, सुधीर ढमाले, किरण सोनीवाल, भाऊ थोरात, हरीश खंडेलवाल, राकेश चव्हाण, कुणाल पवार, रवींद्र पठारे यावेळी उपस्थित होते. साईनाथ मंडळ बुधवार पेठ, सेवा मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट येरवडा, शनि मारुती बाल गणेश मंडळ एरंडवणा, एकता मित्र मंडळ अरणेश्वर, वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ, श्री शिवाजी मंडळ भवानी पेठ, अखिल कापडगंज मित्र मंडळ, अखिल रामनगर मंडळ येरवडा, पोटसुळ्या मारुती मंडळ या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
संगीता बर्वे म्हणाल्या, विद्येच्या देवतेला पुस्तकाचा नैवैद्य ही चांगली संकल्पना आहे. गणेश मंडळांचा यामधील सहभागी मोठी गोष्ट आहे. मुले मोबाईल मध्ये हरवली आहेत, त्यांचे पुस्तकांशी नाते कमी झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगांची पुस्तके पाहिल्यावर मुले मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक हातात घेतील. यासाठी पालकांनी ग्रंथालयांनी मदत करायला पाहिजे. मुलांना पुस्तके वाचून दाखवली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
शिरीष मोहिते म्हणाले, गणेशोत्सव विचारांच्या व ज्ञानाच्या वृद्धीसाठी साजरा करण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी विविध प्रकारची पुस्तके मुलांसाठी गोळा करण्यात आली आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बुध्दीची देवता गणेशाला हा पुस्तकांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. शहरातील गरजू आणि ग्रामीण भागातील मुलांना ही पुस्तके देण्यात येणार आहे.