पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पांना रविवारी अनंत चतुर्दशीला (दि. २३) निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळे रथ, पालख्या, निरनिराळे उपक्रम घेऊन तयार झाली आहेत.विसर्जन मिरवणुकीत रथाबरोबरच ढोल-ध्वज पथके, बँड पथके तसेच लाठीकाठी, लेझीम, शाळकरी मुलांची टिपरी पथके, मल्लखांब पथके अशा निरनिराळ्या पथकांचा समावेश असेल. मानाच्या गणपतीबरोबर सकाळी १० वाजता टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ होईल.मानाचा पहिला श्री कसबा गणपती या मिरवणुकीला सुरुवात करेल. पुण्याची संस्कृती जोपासून मंडळातील अनेक महिला सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर फलकाद्वारे शालेय मुले सामाजिक संदेश देतील. ढोलपथकाच्या गजरात आणि चांदीच्या पालखीत बाप्पा विराजमान होऊन टिळक चौकातून मिरवणुकीस प्रारंभ होईल. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीसुद्धा आपली परंपरा टिकवून पालखीतूनच मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ फुलांच्या आकर्षक सजावट केलेल्या रथातून मिरवणुकीला सुरुवात करेल. मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती शेषनागरथात विराजमान होणार आहे.मानाचा पाचवा केसरीवाडा या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा रथावर साडेनऊ फुटांचा लोकमान्य टिळकांचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.मानाच्या या पाच गणपतींबरोबरच शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता व पेठांमधील अनेक मंडळांचे आकर्षक रथ मिरवणुकीसाठी सज्ज आहेत. मंडईतील जिलब्या मारुती मंडळाने यंदा २५ फुटी बालाजी रथ तयार केला आहे. दोन ढोलपथकांसहित बाप्पाची मूर्ती या आकर्षक रथात विराजमान होऊन रविवारी सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल.बाबू गेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चार पिलर व त्यावर आकर्षक नक्षीकाम असणारा लोटस रथ तयार केला आहे. या रथावर असणारी रोषणाई हे मिरवणुकीचे आकर्षण असेल. तुळशीबागेतील गजानन मित्र मंडळाने गणपतीच्या रथावर कोळी बांधवांसहित होडी तयार केली असून गणपतीच्या मागे एक सुंदर कथक मुखवटा उभारला आहे. श्री गरुड गणपती मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून पारंपरिक पोशाखात गणपती आणायला जाणाऱ्या भक्ताच्या प्रतिकृतीचा रथ तयार केला आहे.बुधवार पेठेतील साईनाथ मंडळाने मिरवणुकीत यंदा साई समाधीचे शताब्दी वर्ष असल्याने सार्इंचा पालखी सोहळा अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात सार्इंच्या हयातीत निघालेली पालखी हुबेहूबपणे साकारणारे कलाकार व पारंपरिक वेशातील कार्यकर्ते सोहळ्याचे आकर्षण ठरेल. या वर्षी बाप्पा दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा आविष्कार असलेल्या श्री लक्ष्मीनारायण रथात विराजमान होणार आहे. रथावर आकर्षक नक्षीकाम केलेले खांब, लक्ष्मीची मूर्ती, हत्तीची मूर्ती असतील. उत्सव मंडपाजवळून मिरवणूक रविवारी सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.नेने घाट गणेश मंडळाचे यंदा १२५वे वर्ष आहे. या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विठ्ठल-रखुमार्इंच्या भव्य प्रतिकृती असणारा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती असून आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ मंडळाने यंदा १० दिवस इंडोनेशियातील शिवकालीन मंदिर उभारले होते. अनंत चतुर्दशीला हे मंदिर रथावर घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येईल.पूर्णपणे चांदीच्या अनेक दागिन्यांनी सजलेला बाप्पा या रथात विराजमान होणार आहे. केळकर रस्त्यावरील माती गणपती मंडळाने गंगा-अवतरण रथ साकारला आहे. रथावर असणारी शंकर, नंदीची मूर्ती आणि मधोमध आसनस्थ बाप्पा रथाचे आकर्षण ठरत आहे. सिटी पोस्टाजवळील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘जय असो महाराष्ट्र पोलीस’ असा रथ तयार केला आहे. पोलीस आणि त्यांच्या कार्याबद्दल आपल्या सर्वांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, असे फलक लावण्यात आले आहेत.
बाप्पांना निरोपासाठी वैभवशाली मिरवणूक, सकाळी १० वाजता प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 2:37 AM