पुणे : शहरातील कल्याणीनगर येथे बड्या बापाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात त्याच्या जवळील पोर्शे कार चालवून दुचाकीवर निघालेल्या तरुण-तरुणीला उडविले होते. या प्रकरणानंतर एखाद्या चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे घटना घडल्याने संपूर्ण देशभर या घटनेची चर्चा झाली होती. आता या प्रकरणाची न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होणार आहे. एका प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
या प्रकरणात अपघातानंतर अल्पवयीन चालक असलेल्या मुलाच्या घरच्यांनी सर्व यंत्रणांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचे म्हणजे, आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने दारूचा अंश रक्तात येऊ नये यासाठी त्याच्या आजोबासह आई-बापाने ससून रुग्णालयातील डॉक्टरच मॅनेज केले. त्यावेळी मोठा आर्थिक व्यवहार झाला. मुलाचे आजोबा, आई-वडील यांच्यासह डॉक्टरांनाही या प्रकरणात अटक झाली. याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहणार आहेत.
बोपदेव घाट प्रकरणात विशेष सरकारी वकील...
पुण्यातील बोपदेव घाट येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साडेसात कोटींच्या ड्रग्जची २५ मार्चला होळी...
पुणे पोलिसांनी मागील वर्षात पकडलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्जची २५ मार्च रोजी होळी करण्यात येणार असल्याची माहितीदेखील अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली. मात्र, यामध्ये कुरकुंभ ड्रग प्रकरणात पकडण्यात आलेल्या ३ हजार ६७४ कोटी रुपयांच्या ड्रग्जचा समावेश नसणार आहे. ती प्रकिया एप्रिल महिन्यात पार पाडली जाणार आहे.