बारामती: बारामती विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तो स्वीकारला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी युगेंद्र पवार यांच्या कन्हेरी येथील ‘अनंतारा’ निवासस्थानी त्यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर आई शर्मिला पवार, वडील श्रीनिवास पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतीरायचे दर्शन घेतले. त्यानंतर साडेदहा वाजता येथील तहसीलदार कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार,सदाशिव सातव,खासदार सुप्रिया सुळे,अॅड.संदीप गुजर,अॅड.एस. एन जगताप उपस`थित होते. पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, माझी ही पहिलीच निवडणुक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहे. माझ्या पाठीशी साहेबांचा आशिर्वाद असल्याने ‘काॅन्फीडन्स’ वाटतो. नक्कीच आपण यशस्वी होऊ. २७ व्या वर्षी बारामतीकरांनी साहेबांना निवडुन दिले. त्यांना आशिर्वाद दिले. त्याचप्रमाणे आज इच्छा व्यक्त करतो. बारामतीकरांनी मला निवडुन द्यावे. साहेबांप्रमाणे नक्कीच चांगले काम करुन दाखवेन.
यंदा प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुतण्याच्या विरोधात नातवाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क तहसिल कार्यालयातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. नातवाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: उपस्थित राहून शरद पवारांनी बारामती विधानसभा निवडणुक गांभीर्याने घेतल्याचे संकेत दिले आहेत.