पिंपरी : नवीन कपडे घेण्याच्या बहाण्याने आजोबांचे अपहरण करून जमिनीचा व्यवहार करणाऱ्या दोघा नातवांसह चौघांवर दिघी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप दत्तात्रय जगताप, किशोर दत्तात्रय जगताप, सादिक हमीद इनामदार, नवनाथ तापकीर (सर्व रा. चऱ्होली, वडमुखवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात साधू महादेव पठारे (वय ७७, रा. पठारे मळा, चऱ्होली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप आणि किशोर हे दोघे भाऊ असून, साधू पठारे त्यांचे आजोबा आहेत .सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे यांनी दिलेली माहिती अशी : साधू पठारे यांचा नावे चऱ्होली परिसरात जमीन आहे. संदीप, किशोर, सादिक आणि नवनाथ यांनी साधू पठारे यांचे विविध कागदपत्रांवर अंगठे घेऊन परस्पर जमीन विकण्याचा डाव आखला. त्यानुसार २७ मार्चला कपडे घेण्याच्या बहाण्याने संदीप आणि किशोर यांनी पठारे यांना दुचाकीवरून शेतात घेऊन गेले. तेथून सादिक आणि नवनाथ यांचासोबत मोटारीमध्ये पिंपरीतील रजिस्ट्रार आॅफिसमध्ये घेऊन गेले. (प्रतिनिधी)
नातवांनीच केले आजोबांचे अपहरण
By admin | Published: April 06, 2015 5:35 AM