विधिमंडळ जे कायदेमंडळ आहे, त्या सभागृहामध्ये रोजगार हमी योजना कायदा व इतर अनेक लोकोपयोगी कायदे निर्माण करण्यामध्ये गणपतराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. विधिमंडळाचे त्यांनी सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व करीत संसदीय लोकशाही कशी सांभाळायची याचा आदर्श घालून देणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, सांगोला व इंदापूर यांचे वेगळे नाते होते. माझे काका कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ ) व गणपतराव देशमुख (आबा) यांनी विधिमंडळात अनेक वर्षे एकत्र काम केले. गणपतराव देशमुख हे रोजगार हमी व पणन खात्याचे मंत्री होते. या खात्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी मंत्रिमंडळात हे खाते सांभाळल्यानंतर माझ्याकडे रोजगार हमी व पणन खाते आले. या खात्याचा त्यांनी चेहरामोहरा बदलला होता. शेतीच्या पाणीप्रश्नाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. सांगोलासारख्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून टेंभू, म्हैसाळ आदी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
पक्ष, नेता व संघटनेवर कशी निष्ठा असावी, याचे उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होत. ते राज्याचे पणनमंत्री असताना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमासाठी आले होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले गणपतराव देशमुख यांची राज्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे, असा नेता पुन्हा होणे नाही, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
गणपतराव देशमुख