इंदापूर : इंदापूर तालुक्यातील आपल्या सासरवाडीत मुक्कामी राहिलेल्या दीड वर्षाच्या नातवाला पहाटे घराशेजारील विहीरीत टाकून देत खून करणाऱ्या आजीला पाेलिसांनी अटक केली आहे. 4 जानेवारी राेजी ही घटना 4.30 च्या सुमारास घडली. आराेपी महिला दीड महिन्यांपासून फरार हाेती. पाेलिसांनी सापळा रचत आराेपी महिलेला आज सकाळी इंदापूर येथे अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सुलोचना सदाशिव तनपुरे (रा. तनपुरवाडी व्याहाळी ता. इंदापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील रवींद्र महादेव जराड यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली हाेती. रवींद्र जराड हे त्यांची पत्नी गौरी व दीड वर्षाचा मुलगा, वेदांत यांच्यासह इंदापूर तालुक्यातील तनपुरवाडी येथे आपल्या सासरवाडीत ३ जानेवारी २०२० रोजी काही कामानिमित्त आले होते, रात्री बारामतीला घरी जायला उशीर झाल्याने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलगा व पत्नीसह सासरवाडीत मुक्कामी राहिले.
ते झोपेत असताना पहाटे ४.३० वाजता फिर्यादीची सासू सुलोचना तनपुरे यांनी त्या लहान बाळाला घरा शेजारच्या विहिरीत टाकून दिले. सकाळी ६ वाजता रवींद्र जराड हे झोपेतून उठले असता, त्यांनी त्यांचा मुलगा रवींद्र याचा शोध घेतला तेव्हा तो कोठेही दिसला नाही. त्यांची सासु सुलोचना तनपुरे यांना विचारले असता, त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता, शेजारील विहारीत पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
आरोपी तनपुरे ह्या दीड महिन्यापासून फरार झाल्या होत्या, मात्र गुरुवारी त्या इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथील बस स्थानकावर येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून, महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने त्या महिलेला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान महिलेने नातवाचा खून का केला, याचे कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही.