खेड तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. गुरुवारी (दि. २२) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात कहू कोयाळी येथे डोंगरावरून आलेल्या पुराच्या पाण्यात आजी आणि नातू वाहून गेले. भोराबाई बुधाजी पारधी (वय ४३) आणि साहिल दिनेश पारधी (वय ४ )असे वाहून गेलेल्या आजी व नातवाची नावे आहेत.
शुक्रवारी (दि.२३) सकाळी ९ वाजता धरणाच्या पाण्यात साहिल याचा मृतदेह मिळुन आला. मात्र, भोराबाई पारधी यांचा मृतदेह आज दिवसभर चासकमान धरणाच्या पाण्यात एनडीआरएफ जवानांनी शोध घेतला. मात्र अद्याप मिळून आला नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फक्त मान धरणालगत असलेल्या कहू कोयाळी परिसरात जोरदार पाऊस झाला होता.दरम्यान कहू येथील ठाकर वस्ती मधील पारधी कुटुंबातील सर्व जण वेताळे येथे शेतात मोलमजुरीसाठी आले होते.सायंकाळी घरी जात असताना बुध्दाजी पारधी हे दुचाकीवरून भोराबाई व साहिल यांना घरी घेऊन जात असताना जोरदार पाऊस आला.यावेळी पावसाचा आसरा घेण्यासाठी वेताळे हद्दीतील चासकमान धरणावरील जकवेल जवळील रस्त्यावर असणाऱ्या मोरीमध्ये त्यांना बसवून कुटुंबातील इतरांना आणण्यासाठी ते पाठीमागे गेले. मात्र त्यानंतर काही वेळात या भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने या मोरीमध्ये जोऱ्यात पाण्याचा प्रवाह आला आणि त्यात दोघेही चासकमान धरणाच्या पाण्यात वाहून गेले. रात्री त्यांचा शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाही. याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र हे दोघेही मिळून आले नाही. दरम्यान, तहसिलदार सुचित्रा आमले व प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन टीमसह घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस पाटील अनिल दाते, पोलीस निरीक्षक सतीश गुरव ,बिट अंमलदार गिजरे यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र अपुरा प्रकाश,पाऊस,चिखल यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. अखेर शोध काम थांबविण्यात आले.आज सकाळी मुलगा साहिल याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला. आज दिवसभर धरणाच्या पाण्यात एनडीआरएफ च्या १५ जवानांनी शोध घेतला . मात्र शोध घेऊनही भोराबाईचा मृतदेह सापडला नाही . सायंकाळी साडेचार वाजता टीमने शोध मोहिम थांबविली . पोलिस निरीक्षक सतीश गुरव पुढील तपास करत आहे.