बाभुळगाव (पुणे):इंदापूर (आंबेडकर नगर) येथील ८२ वर्षीय सरस्वती भिमराव सोनवणे या आजीने आई वडिलांची जुणी आठवण जपण्यासाठी आपल्या शेतातील काढणीस आलेले ज्वारीचे सव्वादोन एकर उभे पिक हे चिमण्या पाखरांना व पक्षांना खाण्यासाठी राखीव ठेवले आहे. त्यांचे शेतातील ज्वारीचे पिकावर दररोज हजारो चिमण्या-पाखरे ताव मारून तृृप्त होत आहेत. या परिसरात पक्षी व पाखरांचा वाढता वावर व सरस्वती आजीचे पक्षी व पाखरांच्या प्रति असणारे प्रेम हे इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या सोळा वर्षापासून सरस्वती सोनवणे आजी या आई वडिलांच्या प्रेमापोटी शेतातील उभे पिक पाखरांना खाण्यासाठी राखुव ठेवत आहेत. त्याचबरोबर शेतात येणार्या पखरांना पिण्यासाठी विकतचे पाणी घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक बाटल्या, मडकी, प्लास्टिक कागद यामध्ये सोय करून पक्षी व पाखरांना मित्र बनवून त्यांची मनोमन सेवा करत आहेत. ८२ वर्षीय सरस्वती आजीच्या पक्षीसंवर्धन प्रेमाची चर्चा ऐकून अनेक पक्षीप्रेमी हे सरस्वती आजीची भेट घेऊन त्यांच्या उपक्रमाचे व पक्षीप्रेमाचे कौतुक करत आहेत.
रब्बी हंगामात देश विदेशातून वेगवेगळ्या जातीचे असंख्य पक्षी व पाखरांचे थवेच्या थवे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात येऊन अनेक दिवस वास्तव्य करतात. वास्तव्यास असलेले पक्षी व पाखरे हे अन्न पाण्यासाठी शेत शिवारात भटकताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो व शेतकर्यांनाही त्यांचा त्रास होतो. काढणीस आलेल्या पिकावर पक्षांचे थवे बसल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असताना इंदापूरातील सरस्वती आज्जी याला अपवाद ठरल्या असुन त्या गेल्या सोळा वर्षापासून पक्षी संवर्धनाचे काम करत आहेत. स्वतःच्या शेतातील ज्वारीचे पिक हे पाखरांना खाण्यासाठी राखीव ठेवण्याचा उपक्रम त्या राबवत आहेत. सरस्वती आजीनी या वर्षी पाखरांना खाण्यासाठी स्वत:चे मालकीचे सव्वादोन एकर क्षेत्र हे ज्वारीच्या पिकासह राखीव ठेवले आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या मुलांचीही चांगली साथ मिळत आहे. सदर शेतीसाठी पाणी कमी पडल्यास विकतचे पाणी घेऊन त्या पीक जगवतात. त्यांचे मुलांचे मत जाणून घेतले असता आमची आई जे काय करेल त्यात आम्ही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. तर सरस्वती आजी या दररोज सकाळी भाकरी बांधून शेतात जाऊन दिवसभर शेतातील चिमण्यां पाखरांसह वेळ घालवतात. आजी गरीब कटुंबातील असूनही त्यांचे चिमण्या-पाखरांवरील प्रेम हे गेल्या सोळा वर्षांपासून जसेच्या तसे असल्याने सरस्वती आजी इंदापूर परिसरात कुतुहलाचा विषय ठरत आहेत.