बारामती : शहरातील माळावरची देवी परिसरात गणपतीला दुर्वा काढण्यासाठी आलेल्या ८० वर्षीय आजी अनवाधानाने निरा डावा कालव्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने आजीबाई कालव्यात बुडु लागल्या. सुदैवाने यावेळी ‘मॉर्निंग वॉक’ साठी आलेल्या तरुणाने हा प्रकार पाहुन थेट कालव्यात उडी घेतली. त्या तरुणाने मोठ्या धाडसाने कालव्यात बुडणाऱ्या आजींना शिताफीने कालव्याच्या काठावर आणले. या युवकाने दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे अखेर वृध्द महिलेला जीवदान मिळाले.मंगळवारी (दि १८ )सकाळी ८ वाजता घडलेल्या या घटनेची शहरात जोरदार चर्चा झाली.बारामती शहरातील संगम पूल ते माळावरच्या देवीकडे कालव्यावरुन जाणारा हा रस्ता दररोज सकाळी कायम गजबजलेला असतो.या मार्गावर व्यायाम,मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ८० वर्षीय आजी आज सकाळी निरा डावा कालव्यात बुडताना येथील वास्तुविशारद मंदार सिकची यांना दिसल्या. पाण्याला वेग असल्याने त्या आजी कालव्याच्या मध्यभागी बुडत होत्या. मात्र, सिकची यांनी कोणताही विचार न करता अजिबात वेळ न घालवता धावत जाऊन उडी मारली.कालव्यात बुडणाऱ्या आजींना गाठुन त्यांना कालव्याच्या काठावर आणले. यावेळी आजी खुप घाबरुन गेल्या होत्या.यावेळी सिकची यांच्याबरोबर व्यायामाला असणारे माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, दीपक बनकर यांनी देखील पुढे येत त्या महिलेला बाहेर काढले यावेळी आजीबाई प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. मात्र, तिघांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यांची विचारपुस केली.त्यामुळे काही वेळातच या आजी झालेल्या प्रकारातुन सावरल्या.या दरम्यान आजींना चहा आणुन पाजण्यात आला. त्यावेळी थोडी तरतरी आलेल्या आजींंनी त्यांनी आडनाव वायसे (पुर्ण नाव समजु शकले नाही) असल्याचे सांगितले. त्या बहुतेक कालव्याच्या कडेला दुर्वा काढण्यासाठी आल्या असाव्यात असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आज घडलेली घटना बारामती शहरात चर्चेचा विषय ठरली.दिवसभर सोशल मीडियावर सिकची यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरु होता. सिकची कुटुंबीय तसे तर नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असते. आज एक बुडणाऱ्या आजींचा जीव वाचवून मंदार यांनी हा वारसा सुरु ठेवल्याचे अधोरेखित केले. स्वतः जीवाची बाजी लावुन ओसंडुन वाहणाऱ्या निरा डावा कालव्यात उडी घेउन कालव्यात पाय घसरुन पडलेल्या आजींना जीवदान देणाऱ्या ‘मंदार’ यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कार्याला आमचा सलाम, असे विविध संदेश बारामतीकरांनी सोशल मीडीयावर ‘व्हायरल’ केले.
दुर्वा काढताना निरा डावा कालव्यात पडलेल्या आजींना तरुणामुळे मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 9:28 PM
शहरातील माळावरची देवी परिसरात गणपतीला दुर्वा काढण्यासाठी आलेल्या ८० वर्षीय आजी अनवाधानाने निरा डावा कालव्यात पडल्या.
ठळक मुद्देदिवसभर सोशल मीडियावर सिकची यांच्या कौतुकाचा वर्षाव सुरु