बारामती : आकड्यांचा गोलमाल करून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी चेअरमन सभासदांची दिशाभूल करीत आहेत. कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता नसताना कारखान्याची विस्तारवाढ केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत संचालकांनी केला आहे. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना ऊसदराची स्पर्धा नको असल्याने विस्तारवाढीला विरोध करीत आहेत, असा आरोप केला. त्यावर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, मदन देवकाते, सतीश तावरे, बाळासाहेब देवकाते, चंद्रराव देवकाते, गोविंदराव देवकाते, अनिल जगताप, अनिल सोरटे, दयानंद लोंढे आणि नितीने शेंडे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे टीका केली. आकड्यांचा गोलमाल करणाऱ्या अध्यक्षांनी इथेनॉल प्रकल्पातून किती उत्पादन झाले, त्यातून किती फायदा झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. विस्तारीकरणाच्या नावाखाली सभासदांच्या शेअर्समधून कपातीपोटी कात्री कशासाठी लावली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी वारेमाप पैशाची उधळपट्टी केली, असा आरोप त्यांनी केला. विस्तारवाढीच्या परवानगीसाठी माळेगाव कारखाना प्रशासनाने अर्ज केला आहे, सहवीज प्रकल्पाचे विस्तारीकरण २१ वरून ३६ मेगावॉटवर नेत असताना कर्ज उचल मर्यादेत बसत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमचे काही संचालक, सभासद उच्च न्यायालयात बाजू मांडत असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ आकड्यांचा खेळ करून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आजी-माजी अध्यक्षांनी केला आकड्यांचा गोलमाल
By admin | Published: March 28, 2017 2:21 AM