पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा जप्त केलेला बंगला वगळावा, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. डीएसके यांच्या ६ वर्षाच्या नातवाच्या वतीने हा अर्ज करण्यात आला आहे.डी.एस. कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी परिसरात १९९६ मध्ये बंगल्याची जागा विकत घेतली होती. तेथे त्यांनी २००६ मध्ये ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेल्या ‘सप्तशृंगी’ हा बंगला बांधला आहे. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्टपूर्ण आहे.डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बंगलाही जप्त करण्यात आला आहे. त्या जप्तीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे.हा बंगला गिफ्ट डीडद्वारे (बक्षीसपत्र) नाते दक्ष शिरीष कुलकर्णी याच्या नावावर २०१६ मध्ये करण्यात आलेला आहे. अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करता येत नाही. त्यामुळे जप्तीतून तो वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद करण्यात आल्याचे डीएसके यांचे वकील अॅड.आशिष पाटणकर, अॅड. प्रतीक राजोपध्ये यांनी सांगितले़ विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. डी एस के यांनी बक्षीसपत्राद्वारे २०१६ मध्ये हा बंगला नातवाच्या नावावर केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याशी संबंधित पैशांमधून हा बंगला बांधण्यात आलेला नाही. आता तो नातवाच्या नावावर असल्याने या बंगल्याचा समावेश जप्त मालमत्ता सूचीमध्ये करता येणार नाही, असा बचाव पक्षाचा दावा आहे.
डीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 12:43 AM
डीएसके यांनी बक्षीसपत्राद्वारे २०१६ मध्ये हा बंगला नातवाच्या नावावर केला आहे.
ठळक मुद्दे२००६ मध्ये ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला ‘सप्तशृंगी’ हा बंगला बांधला.