महाराष्ट्र साहित्य परिषदेत नियमित येत असत.
आजीसाठी तरतूद केलेल्या रकमेतील २५,५५१ रुपयांची रक्कम तिच्या पश्चात साहित्य परिषदेला देणगी म्हणून द्यावी, अशी त्यांची अंतिम इच्छा होती. २००५ साली आजोबांचे निधन झाले. दरम्यान त्यांच्या मुलाचेही निधन झाले आणि एक वर्षापूर्वी आजीचेही निधन झाले. आजोबांच्या इच्छेचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा नातू ओमकार जोशी याने परिषदेत येऊन २५,५५१/- रु. देणगीचा धनादेश कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपूर्द केला आणि या देणगीमागची कथाही सांगितली. ती देणगी स्वीकारताना पदाधिकारीही गहिवरले.
वासुदेव वि. जोशी स्वतः लेखक होते. त्यांच्या कथा रोहिणी, माहेर या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. शं. ना. नवरे, वि. ग. कानिटकर आणि रंगा मराठे या साहित्यिकांशी त्यांचा स्नेह होता. त्यांची तीन-चार पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांनी त्यांच्या मुलालाही परिषदेचे आजीव सभासद केले होते. नातू ओमकार जोशी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रा. जोशी म्हणाले, ''जोशी कुटुंबीयांसारख्या संवेदनशील साहित्यप्रेमी माणसांच्या बळावरच साहित्य संस्था टिकून आहेत. आजोबांच्या इच्छेचा सन्मान करण्यासाठी नातवाने पुढाकार घेऊन देणगी देण्याची ही घटनाच भावुक करणारी आहे. संस्था अशा साहित्यप्रेमी मंडळींच्या मदतीबाबत कायमच कृतज्ञ राहील.''
----
माझे आजोबा लेखक होते. आमचे संपूर्ण कुटुंबच साहित्यावर प्रेम करणारे, वाचनाची आवड जोपासणारे आहे. मी आयटी क्षेत्रात असलो तरी मराठी पुस्तकांच्या वाचनासाठी आवर्जून वेळ काढतो. साहित्य परिषदेविषयी आजोबांना कायमच जिव्हाळा वाटत होता. त्याच जिव्हाळ्यातून त्यांनी परिषदेला ही देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांच्या इच्छेचा सन्मान राखला.
- ओमकार जोशी