सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : कमी खर्चात, पाण्यात एकरी वर्षाला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न रेशीम शेतीमधून मिळते. या शेतीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. यंदा जिल्ह्यात ५०० एकर नवीन रेशीम शेतीचे उद्दिष्ट असून, एकरी तीन लाखांचे अनुदानही देण्यात येत आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हा रेशमी उद्योग विभागाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी कविता देशमुख यांनी दिली.
रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक असून, सध्याच्या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी या उद्योगाची हमखास मदत होऊ शकते. नियमित उत्पन्नामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता या उद्योगामध्ये आहे. यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उद्योगात सहभागी व्हावे व शाश्वत उत्पन्न या उद्योगापासून घ्यावे, असे आवाहन डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्ह्यात सध्या पाचशेहून अधिक शेतकरी तब्बल ५८० एकरांवर यशस्वीपणे रेशीम शेती करत आहेत. जिल्ह्यात नवीन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात बारामती, इंदापूर, शिरूर आणि खेड तालुक्यात उद्योगास जास्त वाव आहे. तर सन २१-२२ मध्ये प्रथमच मावळ तालुक्यात मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग सुरू होत आहे.
-------
मनरेगातून एकरी ३ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, यासाठी शासनाने सन २०१५-१६ पासून या योजनेस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने
अंतर्गत अनुदान देण्यात येते. सन २०२१-२२ पासून एक एकरसाठी ३ लाख ३२ हजार ७४० रुपयांचे अनुदान तीन वर्षांत विभागून दिले जाते. यामध्ये तुती लागवड, साहित्य व कीटकसंगोपन गृह याबाबी समाविष्ट आहेत.
- संजय तेली, उपजिल्हाधिकारी
-------
रेशीम शेतीचे फायदे
- रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते
- एकदा लागवड केली की १२-१५ वर्षे लागवडीचा खर्च नाही.
- इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते.
- रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस कीटकनाशक, बुरशीनाशक इ. फवारणीचा खर्च नाही.
- अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅट्सच्या प्रमाणामध्ये वाढ होते.
------
जिल्ह्यातच होते रेशीम कोषाची खरेदी
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कोषास शासन बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. पुणे जिल्ह्यात बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम संचालनालय व कृषी उत्पन्न
बाजार समिती यांचे समन्यायाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष खरेदी-विक्रीचे मार्केट उपलब्ध आहे. याशिवाय खासगी डिलर्स किंवा कर्नाटक येथील रामनगर येथे देखील मोठे मार्केट आहे.