--
मंचर : मंचर शहरासाठी ७५ लाख रुपयांच्या विद्युत व गॅसवर आधारित अत्याधुनिक शवदाहिनीला जिल्हाधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली. तर जुन्नर तालुक्यातील पूर येथील प्राचीन कुकडेश्वर मंदिर व खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागामार्फत केलेले ५.५० कोटींचे अंदाजपत्रक शासनास पाठवून राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व पुरातत्व खात्याचे संचालक यांच्याकडे मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील यांच्या मागणीवरून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कार्यालयात जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध महत्त्वाच्या कामांबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीस जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.या बैठकीत श्री कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचे काम करण्याबाबत पुरातत्व खात्याने सकारात्मक दर्शविल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्वाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात आलेला आहे.
या गावचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी लक्षात घेऊन शिवसेना राज्यसभा खासदारांकडून निधीची तरतूद करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.सुमारे ५० हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या मंचर शहरासाठी अत्याधुनिक स्वरूपाची सुमारे ७५ लाख किमतीची विद्युत शवदाहिनीची मागणीही जिल्हाधिकारी यांनी मान्य करून लवकरच या कामास प्रशासकीय मान्यता मिळेल असे स्पष्ट केले. धामणी येथे २ कोटी ४७ लाख रुपयांच्या बंद असलेल्या पाणी योजनेतील लिकेज व इतर त्रुटी येत्या पंधरा वीस दिवसात पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंंता कदम यांनी बैठकीत दिली.
संजय मरकळे, पुरातत्त्व विभागाचे उप आवेशक साखरे, वाणी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कदम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तहसीलदार रमा जोशी, जुन्नर आदिवासी विभागाचे ज्येष्ठ नेते काळू शेळकंदे, विकास राऊत, दत्ता गवारी, कुकडेश्वरचे सरपंच सुदाम दिघे, वाळुंजवाडीचे नवनाथ वाळुंज व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.