लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षनिर्यातीचा वेग मंदावला आहे. विमान कंपन्यांच्या दरातली दीडपट वाढ, जहाजांचे वाढलेले दर, कोरोनामुळे आयातदार देशांची कमी झालेली संख्या आणि व मालातली घट यामुळे द्राक्ष निर्यातीत अडथळे आले आहेत.
गेल्या वर्षी १० फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ७६६ टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत ती १० हजार ४१६ टन झाली आहे. द्राक्ष निर्यातीसाठी महाराष्ट्रातून ४५ हजार ३९३ बागांची नोंदणी झाली आहे. कर्नाटकातून १९० बागा नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण ४५ हजार ५८३ द्राक्षबागांची नोंदणी केंद्र सरकारकडे झाली आहे.
युरोपातील अनेक देशांमधून यंदा मागणी नसल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. नेदरलँडला आतापर्यंत ५९६ कंटेनर गेले असून, ७ हजार ७२० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. जर्मनीत ८८ कंटेनरमधून १ हजार १४३ टन, इंग्लंडमध्ये ८४ कंटेनरमधून १ हजार ८५ टन द्राक्षे निर्यात झाली. दरवर्षी भारतातून एकूण ६० देशांमध्ये द्राक्ष निर्यात होते. यातला बहुतांश माल महाराष्ट्रातला व त्यातही नाशिक जिल्ह्यातील असतो.
चौकट
यंदाची आजवरची द्राक्ष निर्यात (आकडे टन)
नाशिक - १० हजार १६५
सातारा - ११९
सांगली - १११
पुणे - २५
नगर - ४
---------
एकूण १० हजार ४१६ टन
चौकट
निर्यातीतले महत्त्वाचे
-विमान कंपन्यांनी मालवाहतूक दरात केली दीडपट वाढ. त्यामुळे बव्हंशी निर्यात जहाजांमधून. या दरातही सरासरीपेक्षा वाढ. -भारतीय चलनात परदेशात द्राक्षाला सुमारे ३०० ते ३२५ रुपये किलोचा दर. द्राक्ष उत्पादकाला खर्च वजा जाता किलोमागे ३० ते ४० रुपये नफा.
-यापूर्वी उत्पादक शेतकरी व निर्यातदार कंपनी यांच्यात ‘डिलर’ हा घटक मध्यस्थ म्हणून काम करीत असे. केंद्र सरकारने तो मध्यस्थांची दलाली बंद केली. शेतकरी थेट निर्यातदाराशी व्यवहार करू शकत असला तरी वाहतुकीचा खर्च वाढल्याने निर्यात मंदावल्याचे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे.