खोडद : जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (दि.१५) दुपारी तीनपासून पावसाला सुरुवात झाली, तो शनिवारी (दि.१६) दिवसभर पडतच राहिला. अनेक द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारीच औषध फवारणीला सुरुवात केली. मात्र, शनिवारी पुन्हा दिवसभर झालेल्या पावसामुळे या औषध फवारणीचा काहीही उपयोग झाला नाही. आज रविवारी (दि. १६) पावसाने सकाळपासूनच उघडीप दिल्याने सर्वच शेतकरी औषध फवारणीच्या कामाला लागले आहेत. ढगाळ वातावरण व झालेल्या पावसामुळे द्राक्ष व डाळिंबावर डावणी, भुरी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा तसेच डाळिंबाची फूलगळ होण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून औषध फवारणी सुरूकेली आहे.दरम्यान, महसूल विभाग व कृषी विभागाने तालुक्यातील द्राक्ष व डाळिंबाच्या बागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी जुन्नर तालुका डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण, उपाध्यक्ष रोहन पाटे, द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष जयसिंग वायकर, राहुल बनकर यांनी केली आहे.सध्या नारायणगाव, खोडद, मांजरवाडी परिसरात थ्री फेज वीजपुरवठा रात्री ११ ते ७ या वेळेत केला जातो, या वेळेत बदल करून रात्री १ ते ९ या वेळेत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर )
द्राक्ष, डाळिंब हंगाम धोक्यात!
By admin | Published: November 17, 2014 5:17 AM