पुणे : मार्केट यार्ड येथील ॠतुराज सोसायटीमधील तरुण मंडळींनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून स्वखर्चाने जेवण तयार करून भुकेलेल्यांना मायेचा घास भरविला आहे. हे तरुण ‘अन्नदान यज्ञा’तून अनेकांची भूक भागवीत आहेत.
या तरुणांमध्ये कुणी डॉक्टर, कुणी वकील, तर कुणी आयटी इंजिनिअर आहेत. इतरांप्रमाणेच त्यांना देखील जिवाची भीती आहेच. पण तरी त्यांनी ‘अन्नदान यज्ञ’ सुरू केला. याविषयी ॲड. अभिषेक जगताप म्हणाले की, आम्ही सोसायटीतील वीस तरुण-तरुणी एकत्र आलाे. सोसायटीमध्ये एक हॉल आहे, तिथे आमच्यामधील सहा ते सात जण मिळून जेवण तयार करतात. त्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते. आम्ही सकाळी लवकर जाऊन मार्केटयार्ड येथून भाजीपाला आणतो, त्यानंतर भाजी निवडण्यापासून ते प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरूवात केली जाते. एका बॉक्समध्ये हे जेवण पॅक केले जाते आणि आमच्यातलेच काही स्वयंसेवक स्वत: दुचाकीवर जाऊन शनिवारवाडा, कोथरूड, कॅम्प आदी भागांतील गरजू, निराधारांना देतो. दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पॅकेट तयार केली जातात. सुरुवातीला आम्ही सर्वांनी पैसे गोळा केले आणि या उपक्रमाचा कामाचा श्रीगणेशा केला. अनेकजण पैशांची मदत देतात, पण ते न घेता धान्य किंवा भाजीपाला आणून द्या असे सांगतो. याशिवाय आम्ही रस्त्यावर सोडलेल्या भाकड गाई, भटकी कुत्री, लहान पिल्लांना देखील खायला घालण्याचे काम करतो. या उपक्रमाला पोलिसांचे देखील सहकार्य मिळत आहे.
---------------------------------------------------------------------------
सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरच्या कुटुंबांना, मुलांना खायला काही मिळत नव्हते. किराणा मालाचे सामान दिले तर ते बनविणार कुठे? असा विचार मनात आला. मग आम्हीच जेवणाचे डबे तयार करून त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला.
- ॲड. अभिषेक जगताप
----------