लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण जीवसृष्टी अपघाताने निर्माण झालेली नाही. विश्वजीवनात आनंद-चैतन्य-सुखसमाधानाचे प्रगटीकरण व्हावे असा विश्वकर्त्याचा हेतू आहे. विश्वातील प्रत्येक घटक त्याची भूमिका योग्य पद्धतीने निभावण्याकरिता आलेला आहे; परंतु मानव मात्र विश्वप्रगटीकरणात त्याला दिलेली भूमिका विसरला आहे. त्यामुळे मानवाविरुद्ध सृष्टीतील जीवजंतू, प्राणिमात्रांनी युद्ध पुकारले आहे. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी गुरुतत्त्वयोगप्रणित सामुदायिक सहजीवन पद्धतीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.
गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.२७) सरदार यांनी गुरुतत्त्वयोग साधकांशी ऑनलाईन संवाद साधत सहजीवनाचे महत्त्व विशद केले.
ते म्हणाले, विश्वजीवनाचा तोल ढळण्यामागे केवळ आताचा मानव जबाबदार नाहीये तर मानवाच्या उत्क्रांतीपासूनच मानव चुकीच्या दिशेने जात आहे. तात्पुरत्या आणि फक्त स्वत:च्या सुखसमाधानासाठी मानवाचा प्रयत्न सुरू आहे. धर्मग्रंथ, साधुसंतांनी मानवाला त्याच्या चुका सांगण्याचा, मानवाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मानवाने त्याकडे कायम दुर्लक्ष केले असून प्राणिमात्रांचे, निसर्गाचे मानवाकडून शोषण सुरूच आहे. मानवाच्या चुकीच्या वाटचालीमुळे सृष्टीतील जीवजंतूंनी मानवाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. जीवजंतूंचे जगणे मानवाने नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तर तेही तुमचे जगणे नाहीसे करणार हेही नक्की आहे. यावर उपाय म्हणजे गुरुतत्त्वप्रणीत सामुदायिक सहजीवन पद्धती आत्मसात करणे. सृष्टीतील जीवजंतूंशी मानवाने शब्दाविना संवाद साधला, क्षमायाचना केली तर सृष्टीचा ढासळत चाललेला तोल सावरण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे सरदार यांनी लक्ष वेधले.
गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या विषयांवर तेजा दिवाण, मुक्ता पाध्ये, स्मिता काळे आणि सुचित्रा पेंडसे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. हेमलता मांडे, ज्योती औटी, उमा शिंदे, वैशाली दामोदरे यांनी गुरुतत्त्वयोगाविषयी अनुभवकथन केले. गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार यांच्या हस्ते झाले.
तेजा दिवाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.