पुणे : रात्रीच्या काळोखात आपल्या मंद प्रकाशाने अवघं नभांगण उजळून टाकणाऱ्या चंद्राचे आकर्षण नाही असा माणूस पृथ्वीतलावर शोधून देखील सापडणे अशक्यच आहे. पण हे सौंदर्य टिपण्यासाठी सुद्धा एक 'खास' नजर लागते. आणि ती सर्वसामान्य माणसापेक्षा कलेच्या प्रांतात मस्त मुशाफिरी करणाऱ्या कलाकाराची असायला हवी. तर मग 'अद्भुत' असं काहीतरी हाती लागल्याशिवाय राहणार नाही.
पुण्यातील एका तरुणाने असंच आपल्या नजरेतून चंद्राचे छोटे छोटे भागांचे जवळपास तब्बल ५५ हजारहून अधिक फोटो काढले आहे. यातून चंद्राचा एकच फोटो तयार केला. हा फोटो म्हणजे अद्भुत कलाविष्काराचा उत्तम नजराणा आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याला लोकांकडून कौतुकाचा तुफान वर्षाव होतो आहे.
पुण्यातील प्रथमेश जाजू या ज्योर्तिर्विद्या परिसंस्था येथे काम करणाऱ्या तरुणाने ३ मे च्या रात्री १ ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या घराच्या टेरेसवरून चंद्राचे जवळपास ५५ हजार इमेजेस काढले.यामध्ये चंद्राच्या छोट्या छोट्या भागांचा समावेश आहे. त्याने टेलिस्कोप व त्याच्याजवळ असणाऱ्या कॅमेऱ्याने ही किमया साधली आहे.
प्रथमेश म्हणाला, ३ मे रोजी माझ्या घराच्या टेरेसवरून चंद्राचे दर्शन झाल्यावर मी रात्री एक ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास हे ५५ हजार फोटो काढले. हा क्षण माझ्यासाठी खूपच खास आणि विलक्षण होता. माझ्याकडे वेगळा कॅमेरा आहे. ज्यात अगोदर व्हिडिओ निघतो आणि त्यातून मग २००० फोटो आपल्याला मिळतात. असे एकूण ३८ विडिओ काढले. त्यातील २५ व्हिडिओ हे २००० फोटोंचे होते तर उरलेले काही ५०० ते ७०० फोटोंचे होते. हे सर्व मटेरियल जवळपास १०० जीबीचे होते. व्हिडिओतुन आलेल्या सगळ्या फोटोंचा एक फोटो मर्च करत गेलो. बाकीचे सगळे फोटो मर्च केल्यानंतर त्यांना फोटोशॉप स्पीच केले. त्यानंतर जो फोटो तयार झाला तो कितीही झूम केला तरी फाटणार नाही.या सर्व प्रक्रियेला ३६ ते ३८ तास लागले.हा फोटो @प्रथमेश जाजू इंस्टाग्रामवर पाहू शकता...
ज्योतिर्विद्या परिसंस्था येथे कार्यरत असलेल्या प्रथमेशच्या या फोटोवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. याबाबत तो म्हणाला, खरंतर आजकाल आपल्याजवळ टेलिस्कोप असेल तर कुणीही आणि कोणत्याही कॅमेऱ्यातून तारे, ग्रह, अॅस्टोनॉमी संबंधित फोटो काढू शकतो. त्याला महागडे साहित्य घेण्याची गरज नाही. एव्हाना आपल्याकडे असणाऱ्या मोबाईलचे कॅमेरे सुद्धा हल्ली खूप चांगल्या प्रतीचे असतात. असे मोबाईल फोन व टेलिस्कोप च्या साहाय्याने आपण मनसोक्त आणि सुंदर अॅस्टोनॉमी फोटोग्राफी करू शकतो.