संदीप वाडेकर पुणे : देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबापासून दूर राहून शत्रूशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी बहुळ ग्रामपंचायतीने माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली आहे. देशासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांना कायम मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेवून बहुळ ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केला आहे. बहुळ ( तालुका खेड) येथे सरपंच गणेश वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा पार पडली. यामध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव मांडला. यावेळी सवार्नुमते त्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी उपसरपंच दीपाली आरेकर, ग्रामसेवक मतकर, संदीप साबळे, प्रवीण साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत वाडेकर तसेच शक्ती साबळे, आदीक साबळे, हनुमंत सुतार, महादेव वाडेकर, अरूण पानसरे आदी माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारने माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील बहुतेक जिल्हा परिषदेने आपापल्या जिल्ह्यात तसेच महापालिकेने माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या अगोदर घेतलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुरज मांढरे पदभार सांभाळत असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना तसे ठराव मंजूर करून घेण्याबाबत कळवले होते. याच पार्श्वभूमीवर बहुळगावचे सुपुत्र माजी सैनिक शक्ती साबळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीने योग्य तो ठराव मंजूर करून घ्यावा अशी विनंती केली होती. ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती खेड यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील काळात या सर्व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना घरपट्टी पासून कायमची सवलत मिळणार आहे.ग्रामसभेत पुरुषांबरोबरच महिलांनीही या ठरावाचे स्वागत केले.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ व्हावी म्हणून पाठपुरावा करणार असून सर्व सैनिकांपर्यंत हा निर्णय पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे