महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेअंतर्गत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना काही विषयांचे प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल)केल्याशिवाय संबंधित विषय पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेणे गरजेचे आहे. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव होण्यास सुरूवात झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही. तर, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
प्रात्यक्षिक केवळ अभ्यासासाठी नाही तर नोकरीसाठी आणि पुढील शिक्षणासाठी उपयुक्त असते. त्यामुळे प्रात्यक्षिकांशिवाय विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे हे विद्यार्थी हिताचे ठरणार नाही. त्यामुळे सध्या नामांकित महाविद्यालयांकडून ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर प्रात्यक्षिकांचे काही व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवले जात आहेत. तसेच काही प्राणी,पक्षी, विविध झाडांची पाने आदींचे छायाचित्र पाठवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केले जात आहे.
--------------------
विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल महत्वाचे आहे. मात्र, कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात महाविद्यालायात बोलवून त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत प्राध्यापकांकडून विविध विषयांचे प्रॅक्टिकल्सचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठविले जातात. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही; याबाबत अधिकाधिक काळजी घेतली जाते.
- डॉ.सविता दातार, प्राचार्य,स.प.महाविद्यालय
------------------------
काही विषयांचे प्रॅक्टिकल केल्याशिवाय विद्यार्थ्यांना तो विषय समजत नाही.तसेच पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी प्रॅक्टिकल उपयुक्त ठरतात. कोरोनाचा धोका कमी झाल्यास प्रॅक्टिकल घेणे शक्य आहे का? याची चाचपणी करून विद्यापीठाने प्रॅक्टिकलसाठी काही वेळ राखून ठेवता येईल का? याचा विचार करावा.
- डॉ.के.सी.मोहिते, प्राचार्य, सी.टी.बोरा कॉलेज, शिरूर
----------------