पुणे : ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज (वय, ६३) यांचे आज अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी, शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीन दिवसापुर्वी मेदूंतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्यांनी संथारा व्रत धारण केले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना समाधीमरण प्राप्त झाले.
आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज आणि प्रमोदसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी ३ फेब्रुवारी १९८२ रोजी पुणे येथे जैन भगवती दीक्षा ग्रहण केली होती. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. प्रसिध्द व्यापारी हरकचंद ताथेड आणि प्यारीबाई हे त्यांचे मातापिता. साध्वी दिव्यदर्शनाजी या त्यांच्या मोठ्या भगिनी होत. विनयकंवरजी महाराज, किरणप्रभाजी महाराज, आदर्शऋषीजी महाराज यांच्या उपदेशाने त्यांना दीक्षेसाठी प्रेरणा मिळाली.
गेल्या ३८ वर्षात त्यांनी महाराष्टृ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी फिरुन भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला. पुण्यातही त्यांचे चार चातुर्मास झाले. प्रभावी प्रवचनकार, शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य, या गुणवैशिष्ट्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीत श्रमण संघामध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.